यातील खास महाराष्ट्रीय - मराठी परंपरा म्हणजे सीमोल्लंघनाची, नव्या मोहिमेच्या नांदीची. यंदा हाच मुहूर्त साधत माध्यमांच्या दुनियेत एक नवा प्रयत्न करतो आहोत. गंभीर मुद्द्यांवर गंभीर मंथन घडवू पाहणारं सर्वांसाठी, सर्वांगीण असं नवंकोरं चॅनेल, 'सकलम' नावाप्रमाणचं सगळ्यांचा विचार करणारं आणि सर्वंकष विचार करणारं हे नवं माध्यम दसरयासोबत दाखल होतं आहे.
विद्यमान राजकीय सामाजिक धुमाळीत वास्तव प्रश्न, विकासाचे खरे मुद्दे आणि त्यावरील सखोल चितंन मंथनाची वानवाच भासते, ही समंजस विचारी, विवेकी समाजाची खंत आहे. माहिती तर अफाट आहे, पण ती जितकी आदळते तितकं चित्र अधिक धुसरचं बनतं. सकलम ही कमतरता दूर करणारा प्रकाशझोत बनेल. लोकांसाठी लोकांचा आवाज हे त्याचं सुत्र.
त्यात माहिती असेलच चर्चा, विश्लेषण, चिकित्सा, आणि भाष्यही असेल. यातील भूमिका सत्य असत्याशी मन केले ग्वाही हीच राहिल. त्याचं समस्त मराठी जन स्वागत करतील हा विश्वास आहे तो याच बळावर की, मराठी माणसाला सकस आशयाची चर्चेची आणि वादविवादाचीही आस आहे. सार्वजनिक चर्चा विश्वाला सजग, प्रगल्भ वळण देण्याची 'सकलम' ची भूमिका आहे.
घटना घडत असताना ती पुढ्यात येऊन ठाकते अशा अती वेगवान माहिती वहनाच्या कळात आपण आहोत. याच काळात तंत्रज्ञानानं प्रत्येकाच्या म्हणण्याला जगापर्यंत पोचवण्याचा अवकाशही दिला आहे. मुद्दा त्यांच्या वापराचा आहे. म्हणूनच समाजमाध्यमं आणि पारंपरिक माध्यमांतूनही तयार होणारया माहितीच्या प्रचंड प्रपातातून रास्त आणि उपयुक्त शोधण्याची गरजही आणखी वाढली आहे. तेच उत्तरही आहे, माध्यमांचा आणि माहितीचा अक्षरशः सुकाळ असलेल्या वातावरणात नवं चॅनल, पोर्टल कशासाठी या प्रश्नाचं.
समकालीन वास्तवाचं सखोल आणि सर्वांगीण दर्शन हा 'सकलम' चा एक हेतू. तंत्रज्ञानावर आधरित माध्यमांसमोरचा एक प्रश्न कायम असतो लोकानुनयी व्हायचं की लोकांच्या प्रती उत्तरदायी रहायचं. 'सकलम' उत्तरदायित्वाचे मूल्य मानतो. स्पर्धात्मक नॅरेटिव्हनं भरलेल्या जगात संतुलित पण ठाम भूमिका घेण्याचं पत्रकारितेचं मूलतत्व सांभाळेल.
सत्याच जामानिमा पांघरुन खोटं बिनदिक्कत हिडंत असंत अशा फेक न्यूज आणि डीप फेक व्हिडीओच्या भडीमाराच्या काळात माहिती देणारयाची विश्वासार्हता, विश्लेषण करणारयांचा वकूब, भाष्य करणारयांचा अनुभव आणि दृष्टीकोन याला कमालीचं महत्त्व येतं आहे. याचं भान असलेला चमू हे सकलमचं यूट्यूब चॅनेलच्या गर्दीतलं वैशिष्ट्य असेल. लोकांच्या वतीनं लोकांसाठी हा कार्यशैलीचा गाभ्याचा भाग असेल.
कोल्हापूरचा शाही दसरा
- दसरा, खंडेनवमीची कोल्हापूरी वैशिष्ट्य
असंख्य घटनाच्या कल्लोळातून आपल्या जगण्यावर परिणाम घडवणाऱ्या घटना घडामोडींची चिकित्सा करणारं... बातमीपत्राच्या रुढ कल्पनेला नवी ओळख देणारं चिकित्सापत्र...